काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं घेतली राज ठाकरेंची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि पक्षांना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महायुतीचा आत्मविश्वास दुणावला असून महाआघाडीच्या नेत्यांपुढे पुन्हा एकदा आपल्या पक्षाला बळकटी देण्याचे आव्हान आहे. विविध राजकीय पक्ष आणि संघटना या पराभवानंतर विविध पर्यायांची चाचपणी करत आहेत. त्याच पार्शवभूमीवर आज काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी दादर येथील राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी आपले उमेदवार न देता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचाराचे रान उठवले होते. राज्यभरात १० मोठ्या सभा घेऊन त्यांनी महायुतीला मतदान न करण्याचे मतदारांना आवाहन केले होते. मात्र या प्रचाराचा त्यांना मतदानात फायदा झालेला दिसून आला नाही. त्यामुळे या विधानसभेला राज ठाकरे सावध भूमिका घेत आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाआघाडीमध्ये देखील त्यांना सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची हि घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. राज्यभरात झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आता सर्वांना बरोबर घेऊन चालण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला आहे.

दरम्यान, पत्रकारांनी जेव्हा यासंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा ही एक सदीच्छा भेट होती हे सांगत याबाबत फार काही बोलणे माणिकराव ठाकरे यांनी टाळले.त्यामुळे आता राज ठाकरे आघडीत येतात कि हि भेट फक्त सदिच्छा भेटच ठरते ,हे आगामी काळ ठरवेल.