मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करून भाजपला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सदर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात आली आहे. सध्या या उपसमितीमध्ये एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, विजय वडेट्टीवार या सदस्यांचा समावेश असून ही समिती आता मराठा समाजाच्या इतर मागण्यांचाही पाठपुरावा करणार आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटवावे. अशोक चव्हाण यांच्या ऐवजी मंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर सक्षम मंत्र्याची अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केली होती.