‘गिरीश महाजन फार लहान, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही’ – नाना पटोले

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन –  भाजप हा भारतमातेच्या नावावर मोठा झाला आहे. त्याच भारतमातेला विकण्याची सुरुवात भाजपने केली आहे. गिरीज महाजन हे तर लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही बोलण्याची गरज नाही, असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ देणार नाही, असे पटोले यांनी म्हटले होते. त्यावरून भाजपकडून यावर टीका केली जात असताना पटोले जशास तसे प्रत्युत्तर देत आहेत. या प्रकरणी महाजन यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत पटोले यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

वाढती इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न आदीवरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र, आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे चित्रपटाचे प्रदर्शनही होऊ देणार नाही, असा इशारा पटोले यांनी दिला होता.