फडणवीसांचे वक्तव्य फारसे मनावर घ्यायचे नाही, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पेट्रोल-डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या भरमसाठ किंमती यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलीकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही, असे प्रत्युत्तर पटोले यांनी दिले आहे.

तसेच पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली असल्याचे ट्विट पटोले यांनी केले आहे. केंद्रात काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विटवर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यावर पटोले यांनी जोरदार टीका केली होती. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला होता. त्यांतर फडणवीस यांनी पटोलेंवर टीकास्त्र सोडले.

फडणवीस म्हणाले होते की, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातील वक्तव्य म्हणजे केवळ पटोले यांचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोलले की, दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसे आणि कोण बंद करू शकते ? अशी विचारणा करत इथे कायद्याचे राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की, तुम्ही मालक आहात. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा चिमटा फडणवीस यांनी पटोले यांना उद्देशून काढला होता. त्यानंतर पटोले यांनी पुन्हा फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.