जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केला काठ्यांचा वर्षाव, तेव्हा अशी ढाल बनल्या प्रियंका गांधी, Video वायरल

नवी दिल्ली : हाथरसमध्ये गँगरेप पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांना शनिवारी सायंकाळी डीएनडी फ्लायओव्हरवर रोखण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी फ्लायओव्हरवर गोंधळ सुरू केला. गोंधळ वाढल्यानंतर जेव्हा पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना तेथून जाण्यास सांगितले तेव्हा पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. यानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठ्यांचा वर्षाव सुरू केला. हे पहाताच प्रियंका गांधी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी तेथे पोहचल्या आणि पोलिसांपासून कार्यकर्त्यांना सोडवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे, जो काँग्रेस पार्टीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेयर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, डीएनडी फ्लायओव्हरवर काँग्रेस कार्यर्त्यांना रोखण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात होता. याच दरम्यान काही कार्यकर्ते पोलिसांचे बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी एका कार्यकर्त्याला पकडले आणि काठ्यांचा वर्षाव सुरू केला. प्रियंका गांधींनी एका कार्यकर्त्याला मरताना पाहताच त्या बॅरीकेड पाडून त्या कार्यकर्त्याजवळ पोहचल्या आणि पोलीस कर्मचार्‍यांना धक्का देत काँग्रेस कार्यकर्त्याला वाचवले. यानंतर कार्यकर्त्याला गाडीत बसवण्यात आले आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी त्याची विचारपूस केली.

खुपवेळानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह 35 नेत्यांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली. हाथरसला जाताना रस्त्यात प्रियंका गांधी यांनी मीडियाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी योगी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्या म्हणाल्या, सरकारने असे का केले. सरकारने पीडित कुटुंबाची मदत केली पाहिजे आणि त्यांना समर्थन दिले पाहिजे. एका मुलीवर एवढी मोठा आघात झाला, त्यानंतर जर आम्ही तिच्या कुटुंबासोबत उभे राहू शकत नाही, त्यांना मदत करू शकत नाही आणि त्यांना न्याय देऊ शकत नाही, तर हे सरकार काय कामाचे आहे. सायंकाळी उशीरा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि न्याय देण्याचा विश्वास दिला. यावेळी प्रियंका गांधी यांनी मृत पीडितेच्या आईला जवळ घेऊन तिचे सांत्वन केले. तर राहुल गांधी यांनी कुटुंबियांना या अवघड काळात हिंम्मत दिली आणि मदत करण्याचा विश्वास दिला.