राहुल गांधींनी शिवसेनेला मुद्दाम डिवचले का ? कोणालाच समजेना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात भाजपपासून दूर झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला का डिवचले, हे कोणत्याच नेत्याला आणि हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना समजले नाही.

दिल्ली येथील रामलीला मैदानावर झालेल्या भारत बचाव रॅलीत राहुल गांधी यांना आपण काय बोलत आहोत हे माहित होते. ते म्हणाले, माझे नाव राहुल सावरकर नाही. माझे नाव राहुल गांधी असून मी कधीही माफी मागणार नाही. सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती. पण ते करणारा मी नाही. हे भगव्या रंगाचे झेंडे असणाऱ्या पक्षांना राहुल गांधींनी सांगितले हे उघडच आहे.

राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी बोलल्या. मेळाव्याचा जो उद्देश होता त्याच प्रमाणे गांधी बोलल्या व त्यांनी राहुल गांधी यांच्या त्या विधानाकडे दुर्लक्ष केले. या मेळाव्यानंतर सोनिया गांधी या लगेचच परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्याशी बोलल्याचे समजतेय. पडद्यामागे घडलेल्या घडामोडीमध्ये शिवसेनेचे संजय राऊत यांनी ट्विटरवर सावध प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणाची तीव्रता मंदावली.

काय आहे खरे कारण ?
आतील गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी सावरकरांचे नाव मुद्दामच घेतले, ते शिवसेनेला डिवचण्यासाठी. हा मेळावा भाजप आणि रालोआला लक्ष करण्यासाठीच होता. राहुल गांधी यांनी त्या लक्षापासून दूर होत शिवसेनेला डिवचले. राहुल गांधी यांच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या आघाडीच्या बाजूनं राहुल गांधी कधीच नव्हते. परंतु राजकीय अपरिहार्यतेमुळे सोनिया गांधी यांनी या आघाडीला मान्यता दिली. तरीही राहुल गांधी हे कधीच या आघाडीबद्दल समाधानी नव्हते आणि जेव्हा त्यांना मानहानिकारक भाष्य करण्याची संधी मिळाली त्याचा त्यांनी फायदा उठवला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/