वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा मोठा निर्णय, इतर नेते अनुकरण करणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहेत. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदाच एका दिवशी एक लाख नवे रुग्ण आढळून आले होते. आज हा आकडा तब्बल 2 लाख 60 हजारांच्या पुढे गेला आहे. देशात महाराष्ट्र, दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर इतर राज्यामध्ये कोरना हात पसरत आहे. काही राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशी तयारी केंद्रान सुरु केली असून दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.

देशात कोरोनाचा कहर वाढत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. या सभांना हजारोंची गर्दी होत आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपल्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यानंतर राहुल गांधी यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महत्वाचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत सांगितले की, कोरोनाची स्थिती लक्षात घेता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा रद्द करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला देऊ इच्छितो की, त्यांनी सध्याच्या परिस्थितीत मोठ्या गर्दीत सभा घेण्याचा परिणामांचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

संपूर्ण देशात लवकरच लॉकडाऊनची घोषणा ?

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या बैठकीला उपस्थित होते. बहुतांश आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील या बैठकीला उपस्थित होते. देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असून लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीत उमटला. देशात लॉकडाऊन करावा अशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.