‘… तर 10 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांवर जाईल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असून, आतापर्यंत १३,९८०,७५१ जणांना या संसर्गाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर ५९३,४५७ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरुन सरकारला सूचक असा इशारा दिला आहे. देशात १० ऑगस्ट पर्यंत कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या २० लाखांपर्यंत जाईल, असे त्यांनी म्हटलं आहे. सध्या देशातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १० लाखांच्यावरती गेली आहे.

राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, “सध्या देशातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहचली आहे. या वेगाने कोरोना संसर्गाचा प्रसार वाढला तर देशात १० ऑगस्ट पर्यंत २० लाखांपेक्षा अधिक कोरोना संसर्गित रुग्ण होतील. सरकारला ही महामारी रोखण्यासाठी काही कडक पावलं उचलणं आवश्यक आहे” असं मत राहुल यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

देशाने पार केला १० लाखांचा टप्पा

देशात गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे ३४,९५६ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या १० लाख ३ हजार ८३२ वर पोहचली आहे. कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्यांची संख्याही वाढत आहे. देशभरात आतापर्यंत ६,३५,७५७ जण उपचारानंतर बरे झाले आहे. देशभरात ३ लाख ४५ हजार रुग्णांवरती उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत देशात कोरोना संसर्गामुळे २५ हजारांपेक्षा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण

राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ६४१ कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या २ लाख ८४ हजार २८१ एवढी झाली. तर २४ तासांमध्ये २६६ मृत्यूंची नोंद करण्यात आली. राज्याचा मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा झाला आहे. तर २४ तासांमध्ये ५ हजार ५२७ रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख ५८ हजार १४० रुग्ण बरे झाले आहेत.