काँग्रेसचे खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर , प्रकृती स्थिर; राज्यमंत्री विश्वजित कदम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना पुण्यात आणण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. राजीव सातव हे आयसीयूमध्ये असून, सध्या ते व्हेंटिलेटवर आहेत, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विश्वजित कदम आणि जहांगीर रुग्णालयाचे डॉक्टर गील यांनी राजीव सातव यांच्या प्रकृतीची माहिती दिली. विश्वजित कदम म्हणाले, ‘राजीव सातव यांच्यामध्ये 19 एप्रिलला कोरोनाची लक्षणे आढळली. त्यानंतर 22 एप्रिलला त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. मात्र, 25 एप्रिलला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरची गरज लागली. सातव यांची इच्छाशक्ती चांगली आहे. जहांगीर रुग्णालयाचे डॉक्टर त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. ते लवकर यातून बरे होतील, असा मला विश्वास आहे. सातव यांची प्रकृती स्थिर असून, गरज पडल्यास मुंबईत हलवण्याबाबत विचार करु’

फोनवरूनच तब्येतीची विचारपूस करावी…

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आणि रुग्णालय प्रशासनावर ताण पडू नये म्हणून कोणीही गर्दी करु नये, फोनवरुनच तब्येतीची विचारपूस करावी, अशी विनंती सातव यांच्या कुटुंबीयांनी केली आहे, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.