काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजीव सातव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून, त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचारांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद देत आहे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळीही आता सामान्य स्थितीत आली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

राजीव सातव यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचे शरीर उपचारांना चांगल्याप्रकारे प्रतिसाद देत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राजीव सातव यांची तब्येत आणखी सुधारेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते. त्यानंतर त्यांच्यावर जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे, असे सांगण्यात आले आहे.

राजीव सातव आहेत तरी कोण?

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे गुजरात प्रभारी आहेत. तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.

तसेच राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले होते. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवलं होते.