‘कोरोना’मुक्त झालेले काँग्रेस नेते राजीव सातव यांना Cytomegalovirus ची लागण; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती शुक्रवारी (दि. 14) रात्री अचानक खालावली आहे. जहॉंगीर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. खासदार सातव यांनी काही दिवसापूर्वीच कोरोनावर मात केली होती. मात्र आता सातव यांना सायटोमेगँलोव्हायरस या नव्या विषाणूची लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. दरम्यान खासदार सातव यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी रूग्णालयाशी संपर्क ठेवून असल्याचे समजते.

गेल्या 15 दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगिर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औषधांंना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. मात्र शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली आहे. दरम्यान आरोग्यमंत्री टोपे यांनी सातव यांना सायटोमेगँलो व्हायरस या नव्या विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली आहे. या विषाणूबाबत विचारले असता राज्याचे माजी आरोग्य संचालक व कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले की, हा आजार नवा नाही, तर जुनाच आहे. तोही संसर्गजन्य आहे. प्रौढांपेक्षा लहान मुलांसाठी तो धोकादायक आहे. यावरची परिणामकारक औषधे उपलब्ध असल्याने रुग्ण लवकर बरा होतो. सातव यांना कोरोना झाल्याने त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता आधीच कमी झाली होती. त्यामुळे त्यांना संसर्ग झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याला को इन्फेक्शन म्हणतात असे डॉ. साळुंखे म्हणाले. कोरोना आणि हा विषाणू यांचा काहीही परस्पर संबध नाही आणि कोरोना झाला की याचा संसर्ग होतो असेही नसल्याचे डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.