रेल्वे प्रवासाची वेळ सरकारने महिलांना पिकनिकसाठी ठरवून दिली का ; काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

मुंबई : सर्व महिला प्रवाशांना सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान व सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. याबाबत पियुष गोयल यांनी काल टि्वट केलं होतं.

या निर्णयानंतर आता राज्य सरकारला सहकार्य करू नये, यासाठी भाजप काही नेते राजकीय दबाव आणत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. उपनगरी रेल्वे प्रवासाची वेळ राज्य सरकारने महिलांना पिकनिकसाठी ठरवून दिली का, असा टोला भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी लगावला आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. नवरात्रीत मायभगिनींना लाभ झाला नसता का? रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना उत्तर द्यावं, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. रेल्वे बोर्डाची परवानगी आधीच का घेतली नाही? याचे उत्तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना दिले पाहिजे, असं आव्हानच सचिन सावंत यांनी पीयूष गोयल यांना केलं होतं.

या निर्णयामागे आर्थिक कारणही आहे. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन बाजारामुळे सध्या छोट्या व्यापाऱ्यांचा धंदा बसला आहे. महिला घराबाहेर पडल्या तर या छोट्या दुकानातील खरेदीला चालना मिळेल. तसेच सध्या महिलांना बाहेर जाण्यासाठी टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. जे सामान्य महिलांना आर्थिक व सुरक्षेच्या दृष्टीने परवडणारे नाही. तसेच यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्र्नही उपस्थित होत आहे. हे लक्षात घेऊन महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली होती, असेही सावंत यांनी सांगितले.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. पण रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केल्याने हा मुहूर्त लांबणीवर पडला होता. आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकृतरीत्या रेल्वेमध्ये महिलांना आजपासून प्रवासास मुभा दिली आहे.