‘हा तर महाराष्ट्रासोबत भगवान श्रीरामाचाही अपमान’ : काँग्रेस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कंगना प्रकरणावरून आता काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे. कुणीतरी पूर्वीची अट्टल ड्रग अ‍ॅडीक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करते आणि स्वत:च्या कार्यालयाला राम मंदिर म्हणते आणि भाजप त्याचं समर्थन करतं. हा महाराष्ट्रासोबत भगवान श्रीरामाचाही अपमान आहे असा हल्लाबोल काँग्रेसनं केलं आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर कंगना रणौत शिवसेनेच्या रडावर आली आहे. कंगना आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. कंगनानं शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर मुंबई महापालिकेनं बुधवारी तिच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर कारवाई केली. यानंतर संतापलेल्या कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. बाबरा हे मंदिर पुन्हा उभं राहिल असं ती म्हणाली होती.

कंगनाच्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. “कंगना रणौतच्या प्रत्येक कृतीमागं भारतीय जनता पक्षच आहे. तोंड कोणाचंही असो शब्द मात्र भाजपचेच आहेत.” असंही ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले, “काल भाजप पुरस्कृत एका चॅनलनं काही लोकांना जमवून निदर्शनं करवणं, मोदी सरकारनं कंगनाला तातडीनं संरक्षण देणं, यातून सत्तापिपासू भाजपचे षडयंत्र दिसत आहे. #महाराष्ट्रद्रोहीभाजपला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजप महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.