कंगना हिमाचलला परत गेली ? ‘आश्चर्य’, काँग्रेसचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यात वाद सुरु झाला. या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. कंगना काही दिवसांपूर्वी मुंबईत आली होती. ती आज पुन्हा हिमाचल प्रदेशातील आपल्या गावी रवाना झाली आहे. ही संधी साधून शिवसेनेनंतर आता काँग्रेसनेही टोलेबाजी केली आहे.

महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करुन कंगनाला डिवचले आहे. कंगना हिमाचलला गेली हे ऐकून आश्चर्य वाटलं. ड्रग माफिया आणि बॉलिवूडशी असलेल्या संबंधांबाबत तिला असलेल्या माहितीचं काय ? नार्कोटिक्स विभागाला या साऱ्याची माहिती देणं हे तिचं कर्तव्य नाही का ? एखाद्या गुन्ह्याविषयीची माहिती स्वत:कडे ठेवणं, ती पोलिसांना न देणं हा भारतीय दंडविधानाच्या कलम 202 व 176 अंतर्गत व एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नाही का ? की कंगनाकडे असलेली ड्रग माफियांची आणि त्यांच्या बॉलिवूड कनेक्शनची माहिती ही केवळ अफवा होती ? अशा प्रश्नांची सरबत्तीच सावंत यांनी केली आहे.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कांगना वादात सापडली होती. शिवसेनेसह राज्यातील सत्ताधारी पक्षांनी तिच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. कंगनानंही शिवसेनेला आव्हान दिल्यानं हा वाद चिघळला होता. या वादात भाजपने कंगनाची बाजू घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. आता कंगना पुन्हा हिमाचलला परतल्यानं सत्ताधारी पक्षांनी तिच्यासह तिच्या समर्थकांवर टीकेची झोड उठवली आहे.

मुंबईतून निघताना कंगनाने केले ट्विट

कंगनाने मुंबईतून निघताना ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने म्हटले आहे की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धाडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे है, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रेहे है ! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे है !! या शेरोशायरीतून कंगनाने महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केल्याचे तिने म्हटले आहे.