‘फडणवीसांनी गुप्तेश्वर पांडेंच्या उमेदवारीला निकराचा विरोध करायला हवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिहारचे निवृत्त पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे संयुक्त जनता दलाच्या (जेडीयु) तिकीटावर आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसनं महाराष्ट्रातील भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांनी गुप्तेश्वर पांडे यांच्या उमेदवारीला निकराचा विरोध करायला हवा असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी अलीकडेच नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे. त्यांना जेडीयुकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे. बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून काम पाहणाऱ्या फडणवीसांकडून सावंत यांनी एक अपेक्षाही व्यक्त केली आहे.

सचिन सावंत म्हणतात, “देवेंद्र फडणवीस हे बिहार भाजपचे प्रभारी असताना जर मुंबई पोलिसांचा अपमान करून महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना भाजपचा सहयोग पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दु:खद असेल. फडणवीसांनी निकरानं विरोध केला नाही तर महाराष्ट्रात त्यांना जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागेल.” असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.