कॅबिनेट मंत्र्याच्या भाचानेच विचारलं – ‘ठाकरे सरकारला जाग येणार का ?’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – रविवारी कोपरगावचे शिवसेना उपतालुकाप्रमुख यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेवरून सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केला की, या हत्या प्रकरणानंतर तरी ठाकरे सरकाराला जाग येणार का?

तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला की, नगरचे पोलिस अधीक्षकपद हे गेल्या तीन महिन्यापासून रिक्तच आहे. कारण तत्कालीन पोलीस अधीक्षक इशू सिंधू हे लंडनला दोन वर्षांच्या शिक्षणासाठी गेले आहेत. सध्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे या पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून पूर्णवेळ पोलीस अधीक्षक देण्याची मागणी करूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. आता शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान याबाबत त्यांनी ट्विट देखील केले असून महाविकास आघाडीला त्यांनी घरचा आहेर दिला आहे.

घडलेली घटना अशी की, रविवारी भोजडे गावात शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुख सुरेश शामराव गिरे यांची काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. हे हल्लेखोर चारचाकी वाहनातून आले होते. या गोळीबारात सुरेश गिरे हे जागीच ठार झाले असून हल्लेखोर गोळ्या झाडल्यानंतर त्यांच्या चारचाकी वाहनातून पसार झाले. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.