‘श्रद्धा और सबुरी’, सत्यजित तांबे यांच्या ट्विट्मुळे चर्चेला उधाण

पोलीसनामा ऑनलाईन : राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने धुसफुस सुरू असतानाच विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 नावांची यादी ( maharashtra-legislative-council-list-delcared) महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्याकडे सुपूर्द केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार 12 नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर केली. नावांची शिफारस करताना सारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. दरम्यान यादी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे (congress-leader-satyajit-tambe) यांनी केलेले ट्विट चर्चेत आहे.

12 नावांची यादी राज्यपालांकडे सोपवल्यानंतर सत्यजित तांबे यांनी ‘श्रद्धा और सबुरी’ असे सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे. परिवहनमंत्री अनिल परब, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या तीन पक्षांच्या मंत्र्यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे 12 नावांची यादी दिली आहे.

यादीत कोणती नावे आहेतः
राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे
शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर
राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष
महाविकास आघाडीने 12 नावांची शिफारस राज्यपालांना सादर केली. राज्यपाल या नावांची आता छाननी करतील. घटनेच्या 171 (5) कलमानुसार, साहित्य, कला, विज्ञान, सहकार चळवळ आणि समाजसेवा या पाच क्षेत्रांतील तज्ज्ञांची नियुक्ती करता येते. घटनेतील तरतुदीनुसार ही सारे नावे आहेत का, याचा आढावा राज्यपालांकडून घेतला जाईल. घटनेतील तरतुदीनुसार ही नावे नसतील तर राज्यपाल नावे फेटाळू शकतात.
महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे राज्यपाल सहजासहजी सारी नावे मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली आहे.