काँग्रेस नेत्याकडून मुलीचा अश्लील व्हिडीओ पोस्ट, लिहिलं : ‘कलम ३७० हटवल्यानंतरचा पहिला ट्रेंड’

बिलासपूर वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा सहसचिव पवन दुबे असं या नेत्याचे नाव असून याने सोशल मीडियावर एक अश्लील व्हीडिओ शेअर केला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बिलासपूर जिल्ह्यातील पेंद्रा गोरेला भागातील वरिष्ठ पोलिस अधीक्षक प्रतिभा तिवारी यांनी शुक्रवारी याबद्दल माहिती दिली. जिल्ह्यातील पेंद्रा-गोरेल्ला येथील काँग्रेसच्या जिल्हा सहसचिव यांनी आक्षेपार्ह आणि अश्लील व्हीडिओ सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपमध्ये शेअर केला. या ग्रुपमध्ये काँग्रेसच्या महिला नेत्यांही सामिल होत्या त्यामुळे या महिलांनी आक्षेप घेत दुबे यांची तक्रार केली आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.

पेंड्रा, गोरेल्ला आणि मारवाहीच्या ब्लॉक काँग्रेसच्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप बनवाला होता. त्यात महिला नेत्यांसह काँग्रेसचे मोठे नेतेही सहभागी होते. या ग्रुपमध्ये पन दुबे यांनी एक अश्लील व्हिडिओ शेअर केला आणि त्याला “कलम ३७० काढल्यानंतर आलेला पहिला ट्रेंड” असं कॅप्शन दिले.

हा व्हिडिओ पाहून महिला नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दुबे यांच्यावर आक्षेप घेतला. आणि व्हिडिओ काढून त्या ग्रुपवर माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर दुबे यांनी व्हिडिओ काढला नाही आणि माफीही मागितली नाही. त्यामुळे संतप्त महिला नेत्यांनी बुधवारी गोरेला पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी पवन दुबे यांच्याविरोधात कलम २९२ आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविला.

दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी पवन दुबे यांना अटक केली आणि न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांना सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.