ठाकरे सरकारकडून मुंबईतील सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचे ‘संकेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लवकरच सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल असं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Namdevrao Wadettiwar) यांनी म्हटलं आहे. ट्विटरवर (TWitter) एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी ही माहिती दिली. कोरोनामुळं गेल्या 7 महिन्यांपासून बंद असणाऱ्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी महिला, वकिल आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

एका प्रवाशानं ट्विट करत लिहिलं की, याआधी महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता वकिलांना देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही ? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे असी खंतही त्यानं व्यक्त केली.

यावर उत्तर देताना वडेट्टीवार यांनी लिहिलं की, “पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊ. या संबंधित चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल” असंही त्यांनी सांगितलं आहे.

याआधीही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याचा निर्णय पुढील 2-3 दिवसात घेण्यात येईल अशी माहिती दिली होती. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून लवकरच लोकल प्रवासाबद्दल निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले होते.