काँग्रेस कार्यकर्त्यानं सोनिया गांधींना पाठवलं पत्र, लिहीलं – ‘शिवसेना-राष्ट्रवादी मिळून…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले असून या वर्षभरात काँग्रेस पक्ष सरकारमध्ये केवळ नावाला एक सहयोगी पक्ष म्हणून आहे. सरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढे दिसून दिसून येतात. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून रणनीती आखून कॉंग्रेसला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याच काम करत आहेत, असा थेट आरोप कॉग्रेसचे विश्वबंधू राय यांनी केला आहे. याबाबत राय यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वबंधू राय हे मुंबई काँग्रेसचे महासचिव आणि माजी खासदार संजय निरूपम यांचे निकटवर्तीय मानले जातात.

राज्यात सध्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीच सरकार सत्तेत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील काँग्रेसचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यात आता राय यांनी थेट महाविकास आघाडीतील सहकारी पक्षाबाबत थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांच्यातील अंतगर्त धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

राज्य सरकारमधील काँग्रेस पक्षातील अनेक मंत्री संघटनेच्या कोणत्याही कामासाठी मदतीस येत नाही. सामान्य जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांना मंत्र्यांच्या विभागाबद्दलही माहिती नाही. राज्यात सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी अनेक विभाग, मंडळं आणि आयोगांवरील पद रिक्त आहेत. त्यावर आतापर्यंत नियुक्ती झाली नाही. आपले सहकारी पक्ष रणनीती आखून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याच काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण अपयशी ठरत आहोत असेही त्यांनीा पत्रात नमूद केले आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस पक्षाद्वारे दिलेल्या आश्वासनांवर कोणतंही काम केलं जात नाही. सर्व आश्वासन तशीच आहेत. तशीच आपली मते आपले सहकारी पक्ष आणि विरोधी पक्ष त्यांच्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहेत. पक्षातून अन्य पक्षात होणारे प्रवेश थांबवण्यासाठीही काही पावल उचलणे आवश्यक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आघाडीच्या नियमांवर चालण्याच्या सूचना देणे आवश्यक असल्याचे राय यांनी सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्रात नमूद केले आहे.