काँग्रेस नेत्यांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, पोलीसांमुळे अनुचित प्रसंग टळला

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

देशातील शेतकरी विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याची चर्चा असतानाच अमरावती येथे शेतकऱ्यांच्या काही मागण्यांकरिता आखिल भारतीय काँग्रेस च्या वतीने आत्मदहन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडल्याने अनुचित प्रसंग टळला. हे आंदोलन अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात आज (सोमवारी) जिल्हा कचेरीवर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात आले.

शेतक-यांच्या प्रश्नांवर शासन टाळाटाळ करीत आहे. किंबहुना शासनाचे शेतकरी विरोधी धोरण असल्यामुळे खरिपाच्या तोंडावर आर्थिक अडचणीतील शेतक-यांवर आत्महत्येची वेळ आली. आम्ही शेतक-यांना मरू देणार नाही, प्रसंगी आम्ही शेतक-यांसाठी जीव द्यायला तयार आहोत, ही भूमिका घेत काँग्रेस नेत्यांनी शासन धोरणाचा निषेध करीत सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा कचेरीवर धडक दिली. व रॉकेल अंगावर घेऊन सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी वेळीच रॉकेलसह कीटकनाशकाची बॅग ताब्यात घेऊन आत्मदहणाचा प्रयत्न हाणून पाडला. २९ मे रोजी काँग्रेस पक्षाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या मागण्या रेटून धरल्या होत्या. दोन दिवसात मागण्यांची पुर्तता न झाल्यास १ जूनला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, राज्याचे कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे निधन झाल्यामुळे त्या दिवशीचे आंदोलन स्थगित करून ते सोमवारी करण्यात आले.

यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. या परिसरात येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले. यावेळी उपस्थित शेकडो पोलीस, चार्ली कमाण्डो, दंगा नियंत्रण पथक आदींमुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनासह पोलिसांची दमछाक झाली. आंदोलनात जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, वनिता पाल यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.