home page top 1

विधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’ नेत्यांना निवडणूक लढण्याचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कमी नुकसान व्हावे यासाठी काँग्रेसने ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ला सुरुवात केली आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये एक खास योजना आखण्यात आली असून राज्यातील 42 दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणुका लढवण्याचे आदेश पक्ष श्रेष्ठींनी दिले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत मोठे नुकसान होऊ नये यासाठी काँग्रेसने ही रणनीती आखली आहे. जे नेते कधीही विधानसभा निवडणूक लढले नाहीत अशा काही नेत्यांना काँग्रेस रिंगणात उतरवणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिले असले तरी राज्यातील नेते त्यांचा आदेश पाळणार का हे पहावे लागणार आहे. लोकसभेत अनेक नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. पक्षातील अंतर्गत वाद, पक्ष बदलणारे नेते, खंबीर नेतृत्त्वाचा अभाव यामुळे राज्यात पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत फार काही मिळणार नसल्याचा अंदाज असल्याने दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेसने निवडणूक लढवण्याचे आदेश दिले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह कमी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपने आक्रमक प्रचाराला सुरुवात केली. त्यातच अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये पूर्वीसारखा उत्साह नाही. त्यामुळे अनेक नेत्यांनी निवडणुकीपासून लाब राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या छाननी समितीची बुधवारी (दि.18) सकाळी साडे दहावाजता बैठक होणार आहे. यांनंतर चार वाजता सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे.

Loading...
You might also like