सोनिया गांधींनी पद सोडल्यानंतर पुढे काय ? काँग्रेसचा प्लान तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली असून गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी या अंतरिम अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, त्यांचा वर्षभराचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे काँग्रेसची सूत्रं नेमकी कोणाकडे जाणार, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

काँग्रेसच्या देशातील 23 महत्त्वाच्या नेत्यांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष हवा असल्याची मागणी केली आहे. एका बाजूला 23 नेते पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष द्या, अशी मागणी करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. परंतु, राहुल गांधी पक्षाध्यक्षपद स्विकारण्यास तयार नसल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

राहुल गांधी यांनी आपण अध्यक्षपद स्विकारण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले. त्याऐवजी गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीकडे अध्यक्षपद सोपवण्यात यावं, असा पर्याय राहुल गांधी यांनी सुचवला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्याऐवजी डॉ. मनमोहन सिंग किंवा ए.के. अँटनी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात येईल. त्यांच्याकडे सोनिया गांधी यांच्या प्रमाणेच अंतरिम अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. कोरोना संकट संपल्यानंतर पाक्षचं अधिवेशन होईल आणि राहुल यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपद दिलं जाईल.