…तर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक रंजक बनेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकीत अध्यपदासाठी राहुल गांधी इच्छुक नसतील तर त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा या अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव स्विकारुन राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांना काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष बनवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून नवीन वर्षाच्या सुरुवातीस काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच राहुल गांधी यांनी अद्यापही अध्यक्षदाच्या निवडणुकीत आहेत की नाही याबाबत नेत्यांना कोणतेही संकेत दिले नाही.

जर राहुल गांधी निवडणूक लढण्यास तयार नसतील तर प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवलं जाऊ शकते. तसेच गांधी घरण्याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उमेदवारीसाठी तयार होऊ शकतात. असे झाले तर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक रंजक बनणार आहे. पंरतु, याचा पक्षावर विपरीत परिणाम होईल, असे पक्षातील जाणकारांचे मत आहे.

याबाबत बोलताना राहुल यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे सदस्य यांनी सांगितलं, “पक्षाला स्थिर करणे, कोणत्याही प्रकारच्या पुर्नबांधणीसाठी तत्पर राहणे अशी आव्हाने काँग्रेस समोर आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसामसारख्या प्रमुख राज्यांच्या निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. आसाम मध्ये सत्ताधारी भाजपशी टक्कर देणारा काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे. तर तामिळनाडूत काँग्रेस द्रमुकसोबत विरोधी पक्षात आहे. हे पाहता काँग्रेसमोर आव्हानांचा डोंगर उभा असून, पक्षाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.”