राहुल राजीनाम्यावर ठाम, काँग्रेस ‘हंगामी’ अध्यक्षाची निवड करणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची चांगलीच पीछेहाट झाली आहे. काँग्रेसला केवळ ५२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. यामुळे राहुल गांधींनी राजीनामा देण्याची घोषणा केली. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. या सर्व घडामोडींवर हंगामी अध्यक्ष नेमण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिलेल्या राजीनाम्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अजूनही ठाम आहेत. अशा परिस्थितीत पक्ष कसा चालवायचा याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. पक्षाच्या एखाद्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याला हंगामी अध्यक्ष नेमण्याचा विचार पुढं आला आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक निर्णय घ्यायचे, असा हा प्रस्ताव आहे. पुढील आठवड्यात लोकसभेतील काँग्रेस नेत्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

लोकसभेत काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधींनी करावं
पक्षाच्या अध्यक्षपदावर राहण्यास राहुल गांधी उत्सुक नसले तरी लोकसभेत त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं, असा नेत्यांचा आग्रह आहे. मागील लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नेते होते मात्र यंदाच्या निवडणुकीत खरगे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाला नवीन लोकसभा नेता निवडणे गरजेचे आहे. त्या पदासाठी राहुल यांच्या नावाचा विचार सुरू आहे.