मनसे-काँग्रेसचं मनोमीलन काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर सध्या लगीनघाई सुरु आहे. येत्या २७ जानेवारीला राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा शुभविवाह होणार आहे. पण या विवाहाच्या चर्चांसोबत राजकीय वर्तुळात देखील काँग्रेस-मनसेच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधी मनसेची भूमिका तर जगजाहीर आहे. अशातच महाआघाडीशी गाठ बांधण्याचा प्रयत्न या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने होऊ शकतो, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात आहे. पण या महाआघाडीच्या चर्चा केवळ चर्चाच असल्याचे देखील मनसेमंडळींनकडून सांगण्यात येत आहे. तर राज ठाकरे यांच्या आमंत्रणावरून देखील काहीजण राजकारणाकडे बोट दाखवत आहेत.

राज ठाकरेंनी चिरंजीव अमितच्या लग्नासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिलेलं आमंत्रण काँग्रेस -मनसे युतीसाठी सूचक मानलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना त्यांनी पत्रिका पाठवलेली नाही. पण, सोनिया-राहुल यांना आग्रहाचं निमंत्रण केलंय. हे त्यांनी मनोमीलनासाठी टाकलेलं एक पाऊल तर नाही ना, असं बोललं जातंय.

राज ठाकरे यांची व्यंगचित्र मोहीम

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उघडलेली ‘व्यंगचित्र मोहीम’ सर्वांनाच ठाऊक आहे. मोदी सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलंय. या सरकारच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. या आवाहनातच, महाआघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव-होकारही दडला होता.

‘राज ठाकरेंना भविष्य आहे ‘ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केले होते. राज ठाकरे आणि शरद पवार यांचा विमान प्रवास ,राज ठाकरे यांनी पवारांची घेतलेली मुलाखत त्यामुळं पवार आणि राज ठाकरे यांच्यातील नातेसंबंध चांगले आहेत हे सर्वश्रुत आहे. शरद पवार यांना मनसेची ताकद नेमकी ठाऊक आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला यश मिळालं नसलं, तरी त्यांना मतदान करणारा एक वर्ग आहे. शिवसेनेची मतं मनसे फोडू शकते आणि त्याचा फटका – युती झाल्यास भाजपालाही बसू शकतो.
You might also like