काँग्रेसच्या ‘दिग्गज’ नेत्यानं CAA वरून CM ठाकरेंना दिलं ‘आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि त्याच बरोबर सीएए वरून संघर्षाची भूमिकाही टाळली. शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने NRC आणि CAA विरोधात विधानसभेत ठराव मंजूर करावी अशी मागणी करत आहे. मात्र त्यांनी ही शक्यता फेटाळून लावत सीएएला पाठिंबा दर्शवत एनसीआरला विरोध केला आहे. याच मुद्यावरून काँग्रेसचे दिग्गज नेते आक्रमक झाले असून काँग्रेसचे नितीन राऊत यांनी सीएए कोणत्याही परिस्थितीत राज्यात लागू करू दिला जाणार नसल्याचे वक्तव्य करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सीएएला विरोध नसल्याचे स्पष्ट करून एनआरसीला मात्र विरोध दर्शवला. मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीनंतर महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सीएए लागू करु दिला जाणार नाही असे व्यक्त केले आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे दिलेले आव्हानच असल्याचे समजले जातेय.

नितीन राऊत म्हणाले, काँग्रेच्या कार्यसमितीत सीएए विरोधात ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा ठराव लागू करण्याचा प्रश्न येत नाही. तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात येणार असून यावर चर्चा होईल असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. सीएए कायद्यावरून उद्धव ठाकरे यांनी हा कायदा कुणाचं नागरीकत्व हिरावून घेणार नसल्याचे सांगत शेजारी देशातून जे शरणार्थी आलेले आहेत त्यांना नागरिकत्व देणारा कायदा असल्याचे म्हटले आहे.