महाविकास आघाडीत बिघाडी ? बाकी सगळं मस्त चाललंय ! भाजपाकडून ठाकरे सरकारवर ‘हल्लाबोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सीएए मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर काँग्रेस नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याचे पडसाद मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी दांडी मारली. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री, अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थिती दाखवल्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर ट्विट करून टीका केली आहे. महाविकास आघाडीत सगळं छान सुरु आहे. फक्त सरकारच्या पत्रकार परिषदेला मंत्रिमंडळातील काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्री उपस्थित नाहीत. बाकी सगळं मस्त चाललंय. मुख्यमंत्र्यांनी सीएए समर्थन केल्याचे पडसाद दिसतायेत असा टोला भाजपने लगावला आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारची दिशाही ठरत नाही आणि सरकारला सूर गवसला नाही. मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांना सुसंवादासाठी बोलावतात. पण सत्तेतील तीन पक्षांमध्येच संवाद नाही, आधी ते साधा, असा सल्ला देत चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला.

 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए आणि एनपीआरवर भाष्य करताना म्हटले होते की, मी दोन्ही कायदे समजावून घेतले आहेत. त्यामुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. केंद्राने प्रसिद्ध केलेली प्रश्नोत्तरेही तपासली. त्यामुळे ज्यांनी आंदोलन भडकावले त्यांनी ते समजून घ्यावे. त्यानंतरच आपली मतं बनवावे. मात्र राज्यातील आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सागितले.

उद्धव ठाकरे यांच्या या वक्त्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की सीएएचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. जोवर निर्णय येत नाही, तोपर्यंत शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांनी सीएएवर कोणतीही ठोस भूमिका घेऊन नये, असा सल्ला त्यांनी दिला होता.