मंत्री सुनील केदारांकडे ग्वाल्हेरचा गड ! थेट ज्योतिरादित्य शिंदेंना ‘आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते आणि राज्यातील पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा आणि युवक कल्याण कल्याणमंत्री सुनील केदार यांच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत समन्वयकाची जबाबदारी सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली आहे.

ग्वाल्हेर आणि मुरैना या 2 जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्वाल्हेर गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं निश्चितच या ठिकाणी सुनील केदार हे ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान देणार आहेत.

मुरैना जिल्ह्यातील जौरा, सुमावली, मुरैना, दिमनी आणि अंबाह तर ग्वाल्हेर जिल्ह्यातील ग्वाल्हेर, ग्वाल्हेर पूर्व आणि डबरा या विधानसभा मतदारसंघात येत्या काळात पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वीही सुनील केदार यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेसचे समन्वयक म्हणून काम केलं आहे.

सुनील केदार यांच्याबद्दल…
सुनील केदार हे काँग्रेसचे नेते आहेत. माजी मंत्री छत्रपाल केदार यांचे ते सुपुत्र आहेत. सुनील केदार हे नागपूरातील सावनेर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा आहे. याशिवाय सुनील केदार यांच्याकडे वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.