काँग्रेसच्या नेत्यांचही ‘जय श्रीराम’ ! CM उद्धव ठाकरेंसोबत आयोध्येत घेणार रामललाचं ‘दर्शन’

अयोध्या : वृत्तसंस्था – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब आणि काही मंत्र्यांसोबत आज अयोध्येत रामललाचं दर्शन घेणार आहेत. हजारो शिवसैनिकही यासाठी अयोध्येत पोहचले आहेत. भाजपाने अयोध्येत येण्यास उद्धव ठाकरे यांना विरोध केल्यानंतर त्यांच्या या दौर्‍याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ठाकरे यांच्या या दौर्‍याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेसचे एक दिग्गज नेते आणि मंत्री या दौर्‍यात सहभागी झाले आहेत. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हेही या दौर्‍यात सहभागी असून ते अयोध्येत दाखलही झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत काँग्रेसनेही जय श्रीराम केल्याची चर्चा आता रंगणार आहे.

राज्यातील 30 वर्षांची युती मोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. ही बाब भाजपाच्या जिव्हारी लागल्याने भाजपा नेते हिंदूत्वावरून उद्धव ठाकरे यांच्यावर सतत टीका करत आहेत. अयोध्येत उद्धव ठाकरे यांना येऊ देणार नाही, असेही काही भाजपा नेत्यांनी म्हटले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्षता मानणार्‍या पक्षांशी हात मिळवणी केल्याने शिवसेनेच्या हिंदूत्वावर टीका करणार्‍या भाजपाला उद्धव ठाकरे यांनी आणखी एक धक्का या दौर्‍यातून दिला आहे, तो म्हणजे त्यांच्या या दौर्‍यात चक्क काँग्रेसचे एक मंत्री देखील सहभागी झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यात सहभागी झालेले काँग्रेसचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी म्हटले की, राम हा सगळ्यांचा असून भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक एकतेचे प्रतिक आहे. त्यामुळे अयोध्येत येवून प्रभूरामाचे दर्शन घेण्यात काहीही वावगे नाही. धर्मनिरपेक्ष पक्ष अशी प्रतिमा असलेल्या काँग्रेसने राम मंदिराच्या प्रश्नावर वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे केदार यांच्या अयोध्या दौर्‍याला महत्व प्राप्त झाले आहे.

उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे अयोध्येत, श्री राम जन्मभूमीच्या दर्शानाला आले असताना त्यांच्या दौर्‍याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती. आजच्या त्यांच्या दौर्‍यावर मात्र, कोरोना व्हायरसचें सावट असल्याने शिवसेनेची नियोजित शरयु नदी महाआरती रद्द करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत पत्रकार परीषद घेणार आहेत. तसेच ते राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते, मंत्री, खासदार, आमदार मोठ्या संख्येने असणार आहेत. त्यातच मुंबई, ठाणे येथून हजारो शिवसैनिक एका रेल्वेतून कालच अयोध्येत पोहचले आहेत.