अनिल परब यांनी आता तरी पराभव मान्य करावा अन् मला काम करू द्यावं; ‘या’ काँग्रेस आमदाराचा निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात तिन्ही पक्षाचे सरकार मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली. तरीही यामध्ये काहीतरी धुसफूस सुरु असते वांद्रे पूर्व काँग्रेसचे आमदार जिशान सिद्धकी यांनी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. परब हे माझ्या कामात अडथळा आणत आहेत. तर वांद्रे पूर्व विधानसभेतील आपला पराभव आता तरी अनिल परब यांनी मान्य करायला हवा. जर याबाबत काहीच झाले नाही तर मला हा विषय विधानसभेत मांडावा लागेल असे आमदार सिद्धकी यांनी म्हटले.

आमदार जिशान सिद्धकी म्हणाले, जनतेने मला कौल दिला आहे. मला माझ्या मतदारसंघात कामे करू द्यात. जाणीवपूर्वक मला विविध ठिकाणी टाळण्याचा मंत्री अनिल परब यांनी जो प्रयत्न सुरू केलाय, हे त्यांना शोभणारे नाही. ते वरिष्ठ मंत्री आहेत. माझ्या मतदार संघात मी करत असलेली छोटी छोटी कामे सुद्धा फक्त वर्षभर NOC न मिळाल्यामुळे पडून आहेत. मी आत्तापर्यत यासंदर्भात माझे सर्व वरिष्ठ नेते यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या कानावर या सर्व गोष्टी घातल्या आहेत. आता हा सर्व विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर मी घालणार आहे. असे ते म्हणाले.

तसेच, पुढे आमदार सिद्धकी म्हणाले, माझ्या मतदारसंघात मी फक्त यांच्यामुळे कामे करू शकत नसेल तर मला याविरोधात आवाज उठवावा लागणार आहे. आणि त्याची सुरुवात आता झाली आहे. सिद्धकी यांनी ट्विटच्या माध्यमातून परब यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय. अनिल परब जाणून बुजून अशा बाबी करत आहेत. गेल्या एक ते दीड वर्षांपासून मी हा त्रास सहन करत आहे. मी माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत बोललो आहे, महाविकास आघाडी सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रॅमद्वारे चांगलं काम करत आहे. मात्र, अनिल परब सारखे काही नेते आहेत जे जाणीवपूर्वक असे प्रकार करत आहेत. म्हणून मला आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलावं लागलं आहे. आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी या प्रकरणात थोड्याफार प्रमाणात सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल परब यांनी लक्ष्यात घ्यायला हवं की मला लोकांनी बहुमत दिलं आहे. त्यांनी त्यांची हार आता तरी मान्य करायला हवी. असे आमदार जिशान सिद्धकी यांनी म्हटले आहे.