घरवापसीच्या चर्चेचं गुर्‍हाळ सुरूच ! काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने विखे-पाटलांबाबत संभ्रमावस्था

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेआधी अनेक इतर पक्षांतील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र निवडणुकीनंतर भाजपला सत्ता स्थापनेत यश आले नाही त्यामुळे आता अशा अनेक गयारामांबाबत ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतणार असल्याच्या बातम्या येत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच मुंबईमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यानंतर अमित देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली होती. मात्र या सर्व घडामोडीनंतर विखे हे भाजप सोडून पुन्हा काँग्रेसवासी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

अमित देशमुख यांना काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांबाबत विचारण्यात आले होते, त्यावेळी काँग्रेसमध्ये पुन्हा येऊ पाहताहेत, त्यांचे स्वागत करायला हवे असे विधान केले होते. त्यानंतर विखे यांच्या काँग्रेस वापसीच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते. मात्र अद्याप विखे पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या नाराज माजी आमदारांनी विखे यांच्याबाबत आपला राग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केला होता. त्यासंबंधीची एक बैठक देखील काल फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अनेक भाजप नेत्यांनी विखे पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्याबाबत पुन्हा एकदा आज अहमदनगर येथे बैठक पार पडणार आहे.

विखे पाटील यांच्या पत्नी आजही काँग्रेसमधूनच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे विखे पाटील पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/