काँग्रेसचे आमदार टी-शर्ट घालून पोहोचले विधानसभेत , विधानसभाध्यक्षांनी काढले बाहेर

गांधीनगर : पोलिसनामा ऑनलाईन – गुजरात विधानसभेत टी शर्ट घालून आल्याने काँग्रेस आमदार आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. सभागृहात असे कपडे घालून येणे अयोग्य आहे, असे सांगत काँग्रेसचे आमदार विमल चुडासामा यांना सोमवारी विधानसभाध्यक्षांनी सभागृहातून बाहेर काढले. दरम्यान या घटनेनंतर काँग्रेस आमदारांनी सभागृहातील पेहरावाबाबत कोणताही नियम नाही. त्यामुळे आमदाराला सभागृहातून बाहेर काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विमल चुडासामा सोमनाथ मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्यावेळी चुडासामा सभागृहात आले त्यावेळी त्यांनी टी – शर्ट घेतला होता. त्यावेळी अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी आक्षेप घेतला होता. तसेच यापुढे असे करून सभागृहात येऊ नये असे सांगितले होते. तरीही चुडासामा सोमवारी टी-शर्ट घालून आले. त्यांना कपडे बदलून या, असे अध्यक्षांनी सांगताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. चुडामासा यांनी या कपड्यात वाईट काय आहे, निवडणूक प्रचारही आपण टी-शर्ट घालूनच केला होता, असे म्हंटले. तसेच कोणता पोशाख घालावा वा घालू नये, याचे काहीही नियम नाहीत, असेही त्यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र अध्यक्षांनी वाटेल ते कपडे घालायला हे खेळाचे मैदान नाही, असे सुनावले. तसेच त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. लगेचच सभागृहात आलेल्या तीन ते चार मार्शलंनी चुडासामा यांना बाहेर नेले.

दरम्यान, विधान कार्यमंत्र्यांनी अध्यक्षांशी वादावादी केल्याबद्दल चुडासामा यांचे सदस्यत्व रद्द करावे, असा प्रस्ताव मांंडला. मात्र यामध्ये हस्तक्षेप करत मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अशा प्रस्तावाची गरज नाही, चुडासामा यांची काँग्रेस आमदारांनी समजूत घालावी, असे सांगून विषय तिथेच मिटवला.

कर्मचाऱ्यांना आहे नियम
विधानसभा सभागृहात येताना सदस्यांच्या पेहरावाबाबत कोणताही नियम नाही. ईशान्येकडे असणाऱ्या अनेक राज्यांतील आमदार मात्र सभागृहांत टी शर्ट व जीन्स घालून गेल्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांनी काय कपडे घालावेत, याबाबत काहीही नियम नाहीत. विशेष म्हणजे हे आमदार टी शर्ट घालतही नाहीत. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात टी शर्ट व जीन्स घालून जाण्यास बंदी आहे.