दिलदार ! आमदारानं रूग्णसेवेसाठी दिली चक्क 40 लाखांची फॉर्च्यूनर

जयपूरः पोलीसनामा ऑनलाइन – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अशावेळी अनेक ठिकाणी औषधांचा काळाबाजार, रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरु आहे. तर दुसरीकडे माणुसकीच दर्शन देखील घडत आहे. जयपूरमधील काँग्रेस आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली 40 लाख रुपयांची फॉर्च्यूनर गाडी चक्क रुग्णवाहिका बनवून गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे.

 

 

 

 

गुना जिल्ह्यातील चांचौडा विधानसभा मतदारसंघात आरोग्य सुविधांची वानवा आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने हाल होत आहेत. त्यामुळे आमदार लक्ष्मणसिंह यांनी आपली 40 लाखांची कारच रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार सिंह यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात रुग्णवाहिका अभावी गाव- खेड्यातील रुग्णांची गैरसोय होत आहे. आरोग्य विभागाने परवानगी दिल्यास, मी माझी खासगी कार रुग्णांच्या सेवेसाठी देईन, असे म्हटले होते. मंगळवारी रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी आपली गाडी आरोग्य विभागाकडे सुपूर्द केली आहे. त्यानंतर आमदार सिंह यांनी एक व्हिडिओ शेअर करत माझी फॉर्च्यूनर कार रुग्णांसाठी दिल्याचे म्हटले आहे. तसेच मतदारसंघातील नागरिकांना सेवा करण्याची संधी दिली. माझेही कर्तव्य असून मी शक्य ती मदत करेन असेही आमदार सिंह यांनी म्हटले आहे. सध्या रुग्णावाहिका म्हणून या गाडीचा उपयोगही सुरू झाला आहे.