काँग्रेसला आणखी एक खिंडार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. मुंबईतील वडाळा येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या संपर्क कार्यालयावरील बॅनरवर राहुल गांधींचा फोटो काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आजच काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याचदरम्यान मुंबईतील वडाळा येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे. आमदार कोळंबकर यांच्या संपर्क कार्यालयावर लावण्यात आलेल्या बँनरवर राहुल गांधी यांचा फोटो होता. मात्र आता राहुल गांधींचा फोटो नसून त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे आमदार कोळंबकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.

विशेष म्हणेज, यासंदर्भात आमदार कोळंबकर याना प्रसार माध्यमांनी विचारले असता, माझ्या मतदार संघात जो माणूस काम करेल त्यांचाच फोटो बॅनर वर लावला आहे. आगामी काळात जो माणूस काम करेल त्यांनाच माझा पाठिंबा असेल असे त्यांनी स्पष्ट केले.