”भाजपने वंचित बहुजन आघाडीला सांगितलयं की, सोलापूरात जा आणि पेटवा..”

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यामुळे नेत्यांच्या आरोपांनाही वेगळा रंग चढत आहे. सोलापूरातील आघाडीचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचार सभेत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावर टीका केली.

भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावर टीका सडकून टीका केली. ज्या महाराजांना एफआरपी, हमीभाव काय माहीत नाही, कसलाच अनुभव नसलेल्याना प्रश्न कसे कळणार ? आपल्यासमोर कोण आणलंय, तर महाराज. यांना काय माहिती ? अनुभवच नाही यांना. कुठे ४० वर्षांचा दांडगा अनुभव आणि कुठे शुन्य अनुभव. फक्त मठातला अनुभव, असं म्हणत शिवाचार्य यांच्यावर प्रणिती शिंदेंनी टीका केली.

त्यानंतर, प्रकाश आंबेडकरांवरही त्यांनी आक्रमक होऊन टीका केली. दुसरे तिसरे कोण ते, अकोल्यावरून आलेत. अकोल्यावरुन आलेल्या माणसाचं आपल्या येथे काय काम ? तो येऊन आपल्याला शिकवेल, असं कर तसं कर ? असे म्हणत त्यांनी टीका केली.

भाजपची बी टीम असलेल्या वंचित बहुजन आघाडीला फक्त सांगितलं गेलंय की, सोलापूरला जा आणि लावा, पेटवा.. बस्स. आणि आपण त्यांच्या मागे जाणार, असा गंभीर आरोपही प्रणिती शिंदेंनी केला.

दरम्यान, सोलापूर ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर गेल्या पाच वर्षातील मोदी सरकारची कामगीरी पाहता काँग्रेसने पुन्हा एकदा सुशील कुमार शिंदेंना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या समोर प्रकाश आंबेडकर आणि जयसिद्धेश्वर शिवाचार्य आहेत. त्यामुळे सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.