काँग्रेसचे आ. विश्वजीत कदमांच्या गाडीचा पुण्यात अपघात, सुदैवानं ते थोडक्यात बचावले पण डाव्या खांद्याला किरकोळ दुखापत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार विश्वजीत कदम मुंबईहून पुण्याला घरी येत असताना बीएमसीसी रोडवर दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची मर्सिडीज कार एका झाडाला धडकली. त्यात आमदार विश्वजीत कदम हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात त्यांच्या बीएमसीसी रोडवरील रायगड बंगल्यासमोर मध्यरात्री साडेबारा वाजता घडला. कारचालक सचिन यालाही किरकोळ मार लागला आहे. मात्र, या अपघातात मर्सिडिज कारचे मोठे नुकसान झाले.

याबाबतची माहिती स्वत: विश्वजित कदम यांनी व्हॉट्सअ‍ॅप करुन सर्वांना दिली आहे. त्यानुसार, बुधवारी रात्री ते मुंबईहून पुण्यात येत होते. बीएमसीसी रोडवरील रायगड बंगला येथे ते आले असताना समोरुन एक दुचाकीस्वार वेगाने आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालक सचिन यांच्या हातातून गाडी रस्त्याकडेच्या झाडाला धडकली. सुदैवाने दोघांना किरकोळ दुखापत झाली. विश्वजित कदम यांच्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

विश्वजित कदम यांनी दिलेली माहिती

नमस्कार,
मुंबईहून पुण्याला येत असताना माझ्या गाडीला काल रात्री पुण्यामध्ये गाडी झाडाला धडकल्याने छोटासा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. मी व ड्रायव्हर दोघेही सुखरूप आहोत. माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही तसेच कोणताही धोका नाही. साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेतच. मी सुखरूप आहे काळजी नसावी!
..
आमदार
डॉ. विश्वजीत कदम

Visit : Policenama.com