जय श्री राम ! काँग्रेस आमदाराकडून राम मंदिर उभारणीसाठी 51 लाख

रायबरेली : वृत्तसंस्था – अयोध्येतील राम मंदिरासाठी अनेक पक्षातील नेते देणगी देताना दिसत आहेत. बंडखोर काँग्रेस नेत्या आणि आमदार अदिती सिंह यांनी अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टचे सचिव चंपत राय यांना आपल्या समर्थकांकडून गोळा केलेला 51 लाखांचा चेक सोपवला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

अदिती यांनी ट्विट करत लिहिलं की, माझे सर्व सहकारी आणि टीममधील सदस्यांच्या वतीनं मी ही देणगी विश्व हिंदू परिषदेला देत आहे. यासाठी सर्वांनीच योगदान दिलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

वडिल असते तर त्यांना हा कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला असता. पक्षाचा विचार न करता कार्यक्रमाचं पावित्र्य सर्वांनी जपलं पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

अदिती सिहं या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांच्यावर जिल्ह्यातील नागरिकांना न भेटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

राम मंदिरासाठी देशव्यापी निधी संकलन अभियान राबवलं जात आहे. माघ पौर्णिमा म्हणजेच 27 फेब्रुवारी पर्यंत हे अभियान चालणार आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी आतापर्यंत 600 कोटींपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे. देशभरातून राम मंदिर उभारणीला चांगला प्रतिसाद मिळत असून परदेशातील भारतीय नागरिक देखील निधी देत आहेत.