दारूच्या नशेत कॉंग्रेस आमदार पुत्राचा पोलिसांवर प्राणघातक हल्ला; 3 जणांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दारूच्या नशेत तर्र असलेल्या कर्नाटकातील कॉंग्रेसच्या आमदार पुत्राने पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला केला. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या नशेबाज मुलासह अन्य दोघांना अटक केली आहे.
फैयाज नसीर अहमद असे या मुलाचे नाव आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार नसीर अहमद यांचा तो मुलगा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कर्तव्यावर असणाऱ्या बंगळुरू पोलिसांच्या पथकावर दारूच्या नशेत असलेल्या फैयाजने प्राणघातक हल्ला केला. बंगळुरुमधील अमृथल्ली पोलीस स्टेशनजवळ रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला आहे. बंगळुरू (उत्तर पूर्व) डीसीपी सी. के. बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. काँग्रेस आमदार नसीर अहमद यांचा मुलगा फैयाज याने पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला तेव्हा दारूच्या नशेत होता असा आरोप आहे. याशिवाय त्याने पोलिसाच्या टीमवर प्राणघातक हल्लादेखील केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.