काँग्रेसचे खासदार गौडा आणि याज्ञीकांचे भाजप सरकारवर ‘घणाघाती’ आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नोटबंदीने जनतेच्या बचतीचे पैसे काढून घेतले. रिझर्व्ह बँकेतून पैसे काढून घेतले आहेत, असे असूनही देशात मंदी का? युवावर्ग बेरोजगारीच्या विळख्यात सापडला असताना, पंतप्रधान युवकांच्या रोजगारावर बोलण्याऐवजी पाकिस्तानवर बोलून लक्ष विचलित करत आहे. याचे परिणाम येत्या काही काळात देशाला भोगावे लागणार असून हे सरकारच याला कारणीभूत असल्याचा आरोप अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अभ्यास गटाचे अध्यक्ष खासदार राजीव गौडा आणि खासदार अमी याज्ञीक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

कॉंग्रेस भवन येथे आयोजित या पत्रकार परिषदेस कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष रमेश बागवे व अन्य पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. अमी याज्ञीक म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपुर्वी घेतलेल्या नोटबंदीचे चटके आता बसू लागले आहेत. नोटबंदीने जनतेचा बचतीचा पैसा बाहेर काढला. कॅशलेसच्या नावाने खर्‍याअर्थाने जनतेला कॅशलेस बनविले. यानंतर रिझर्व्ह बँकेतून १ लाख ७० हजार कोटी रुपये घेण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा बाजारात आला असताना उलाढाल थंडावून मंदीचा विळखा वाढतच चालला आहे. यावर कडी म्हणून चुकीच्या पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी केल्याने व्यापार, उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. महागाई गगनाला भिडली आहे. मागणी अभावी उद्योग बंद पडू लागले आहेत. बँकांतील हजारो कोटींची कर्जे बुडवून अनेकांनी पोबारा केला. त्यांना पकडायची आणि ती संपत्ती परत मिळवायची कुठलीही योजना सरकारकडे नाही. यामुळेच, एकापाठोपाठ एक बँका दिवाळखोरीत निघू लागल्या आहेत. जनतेचा बँकांवरील विश्‍वास उडायला सरकारची चुकीची ध्येयधोरणेच कारणीभूत आहेत.

सरकार बेरोजगारी, जीडीपीबाबत कुठलिही आकडेवारी देत नाही. माहितीच्या अधिकारात ती माहिती मागावी तर या कायद्यातही बदल करून लोकांना माहिती उपलब्ध करून दिली जात नाही. आमच्या सत्ताकाळात प्रत्येकाला शिक्षण मिळावे या उद्देशाने राईट टू एज्युकेशनचा कायदा आणला होता. प्रत्यक्षात भाजपने महाराष्ट्र, राजस्थानसारख्या अनेक राज्यातील हजारो शासकिय शाळा बंद केल्या आहेत. डिजीटल इंडियाच्या नावाखाली केवळ व्हॉटस्अप इंडिया सुरू केली आहे. प्रत्यक्षात शिक्षणासाठी डिजीटल इंडियात काहीच केले गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशातील युवकांच्या हाताला काम नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या पाकिस्तानसारख्या नेस्तनाबूत झालेल्या देशावरच बोलत फिरत आहेत. त्यांच्याकडे रोजगार, शेतकर्‍यांसाठी कुठलाही प्लॅन नसल्याने केवळ भावनिक मुद्द्यांकडे जनतेचे लक्ष वेधण्याचा एककल्ली कार्यक्रम सुरू आहे. सरकारच्या या वृत्तीमुळे आता जाणवणार्‍या मंदीच्या झळा अधिक तीव्र होत जाणार असून आर्थिकदृष्ट्या मागील पाच वर्षात ५ वरून ७ व्या क्रमांकावर आलेला आपला देश आणखी गर्तेत जाणार आहे, असा आरोपही याज्ञिक आणि गौडा यांनी केला.

छोटे कंपनीधारक बुडाले परंतू जय अमित शहांच्या कंपनीचा टर्नओव्हर हजारपटीने वाढला
नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशातील अनेक छोटे उद्योग बंद पडले आहेत. असे असताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीचा २०१४ मध्ये असलेला ७९ लाख ६० हजार रुपयांचा टर्नओव्हर अवघ्या पाच वर्षात अर्थात २०१९ मध्ये ११९ कोटी ६१ लाख रुपयांवर पोहोचला आहे. पाच वर्षात जय शहा यांच्या कंपनीचा एवढ्या पटीत टर्नओव्हर कसा वाढला, याचे गुपित सांगण्याचे धारिष्टय मात्र अमित शहा दाखवत नाहीत, असा टोलाही खासदार अमी याज्ञिक यांनी यावेळी लगावला.

Visit : Policenama.com