काँग्रेसला सापडला निवडणूक जिंकण्याचा ‘फॉर्म्युला’, भाजपला दिला खोचक ‘सल्ला’

पोलीसनामा ऑनलाइन टीम : ‘सुधारित नागरिकत्व कायद्यामुळेच भाजपाला झारखंडमध्ये पराभव पत्कारावा लागला. तसेच महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची खराब कारभारामुळे त्यांची सत्ता ढासळली. याचे महत्वाचे कारण म्हणजे मोदी सरकारनं काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय,’ अश्या शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपला लक्ष्य केले. ते गुवाहाटीत बोलत होते.

भाजपाच्या निवडणुकीतील कामगिरीवर टोलेबाजी करताना आझाद म्हणाले कि, तुम्ही जितकी वादग्रस्त विधेयकं देशासमोर आणाल, तितक्या जास्त ठिकाणी तुम्हाला जागा गमवाव्या लागतील. तसेच भाजपानं महाराष्ट्र, हरियाणातील निवडणुकीच्या महिनाभर आधी काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हरियाणात त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी सगळीकडून आमदारांची जुळवाजुळव करावी लागली. यानंतर देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या ह्याच कारभारामुळे त्यांना झारखंड गमवावं लागलं. आता दिल्लीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. ‘२०१४ च्या निवडणुकीपूर्वी मोदींनी काळा पैसा भारतात आणून, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र काळा पैसा भारतात आलाच नाही. यासोबतच रोजगार उपलब्ध करण्यास, महागाई आटोक्यात आणण्यात ते अपयशी ठरले. या उलट त्यांच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत. सोबतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. मात्र तरीही कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत,’ अश्या शब्दात आझाद यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/