‘मोदी सरकारनं सांगितलं आत्मनिर्भर बना म्हणजे तुमचा जीव स्वतःच वाचवा, पंतप्रधान तर मोरांसोबत व्यग्र आहेत’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात मागील काही दिवसांपासून ९० हजारांच्यावरती कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोना रुग्णांच्या बाबतीत अमेरिकेच्या खालोखाल भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच अनुषंगाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा समाज माध्यमावरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “अनियोजित लॉकडाऊन ही एका अहंकारी व्यक्तीची देणं आहे. ज्यामुळे कोरोना देशात पसरला,” असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “कोरोना संसर्गाचे आकडे या आठवड्यात ५० लाख आणि सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १० लाखाच्या पार गेलेली असेल. अनियोजित लॉकडाऊन ही एका अहंकारी व्यक्तीच देणं आहे. ज्यामुळे कोरोना देशात पसरला. मोदी सरकारनं आत्मनिर्भर व्हा असे सांगितलं आहे. म्हणजेच स्वतःच जीव स्वतःच वाचवा, कारण पंतप्रधान मोरासोबत व्यग्र आहेत,” अशा शब्दांत राहुल यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे.

सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल परदेशात

काँग्रेसकडून सांगितल्यानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या वार्षिक चेकअपसाठी परदेशी रवान्या झाल्या आहेत. आईची काळजी घेण्याकरता राहुल गांधी सुद्धा सोबत आहेत. जवळपास २ आठवडे सोनिया गांधी परदेशात राहणार आहेत. म्हणून संसद अधिवेशनाच्या जवळपास ५० टक्के चर्चेत त्या सहभागी होऊ शकत नाही. मात्र, राहुल एक-दोन दिवसात मायदेशात परतणार असल्याची माहिती मिळत आहे. परदेशी रवाना होण्याआधी राहुल गांधी यांनी शुक्रवारी संरक्षण संबंधी संसदीय समितीच्या बैठकीत सहभाग नोंदवला होता.