काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांची २२ दिवसांची झुंज ठरली अपयशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – कोेरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने व्हेंटिलेटरवर उपचार सुरु असलेले काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ४६  वर्षाचे होते. गेली २२ दिवस त्यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. राहुल गांधी यांच्या निकटवर्तींमध्ये राजीव सातव यांची गणना होत होती. आज अखेर त्यांची २२दिवसांची झुंज अपयशी ठरली आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली. तेव्हा त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय झाला होता. परंतु, प्रकृतीची स्थिती लक्षात घेता त्यांना हलविणे शक्य नसल्याने त्यांच्यावर पुण्यातच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. त्यांची प्रकृती सुधारत असतानाच काही दिवसांपूर्वी त्यांना सायटोमॅगिलो या नवीन विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यातून त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. गेले काही दिवस त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

त्यांची प्रकृती खालावत होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पुण्यात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. कॉंग्रेसच्या युवा बिग्रेडमध्ये राजीव सातव यांची गणना होत होती. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्येही सातव हे हिंगोली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. त्यांच्यावर मागील गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीमध्ये त्यांचा समावेश होता.