राहुल गांधी यांचे ‘विश्वासू’ सहकारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं पुण्यात उपचारादरम्यान निधन

पुणे : पोलीसनामा ऑनालाइन –  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी नुकतीच कोरोनावर मात केली होती. पण, शनिवारी (दि. 15) पुन्हा एकदा त्यांची तब्येत खालावली. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आणि आज (रविवार) त्यांचे निधन झाले आहे.

राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी हॉस्पिटलकडे धाव घेतली होती. सातव यांच्यावर पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू होते.

गेल्या महिन्यात खासदार सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर 10 मे रोजी त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घऱी सोडण्यात येणार होते. पण अचानक खासदार सातव यांची प्रकृती खालावली. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला. आज (रविवार) सातव यांचे निधन झाले.

सातव हे कॉंग्रेस नेेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. गेल्या वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी सातव यांची निवड करण्यात आली होती. 2014 साली सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.