काँग्रेस पक्षात राम मंदिर भूमिपूजन मुद्द्यावरून वाद, निर्माण झाले 2 गट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आयोध्येत राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रम धार्मिक वातावरणात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भाजपकडून केला असला तरी याला काँग्रेसमधील काहींनी समर्थन केले आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्येही राम मंदिर भूमिपूजनच्या मुद्द्यावरून वाद पेटलाय.

राम मंदिराचे कुलूप माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी उघडले होते. तेथेच राम मंदिर व्हावे, अशी लोकांची इच्छा होती, असे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले होते. त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे स्वागत केले आहे.

तर, कमलनाथ यांनी भोपाळमध्ये प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यालयाच्या मुख्य द्वारानजीक श्रीरामच्या फोटोसमोर दीप प्रज्ज्वलित केले होते. तर, दिग्विजय सिंह यांनी देखील राम मंदिराच्या भूमिपूजनाचे समर्थन केले होते. मात्र, दिग्विजय सिंह यांनी भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून काही प्रश्न उपस्थित केलेत.

काँग्रेसच्या एका खासदाराने कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी राम मंदिर मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यांबाबत चिंता व्यक्त केलीय. याबाबत केरळचे खासदार टी. एन. प्रतापन यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.

काँग्रेस पक्ष हा अतिधार्मिक राष्ट्रवादाच्या मागे पळू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे द्वेषाच्या राजकारणाचे एक युग समाप्त झालेय. आम्ही यात कोणत्याही प्रकारच्या हिस्सेदारीचा दावा करता कामा नये, असे सांगताना आमच्या सारख्या नेत्यांना भूमिपूजन कार्यक्रमासाठी कशासाठी आमंत्रित करावे?, असा सवालही प्रतापन यांनी सोनिया गांधी यांच्यापुढे उपस्थित केलाय.

दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्या वक्तव्यांमुळे मी खूप निराश झालोय. अयोध्येत राम मंदिर हे संघ परिवार बनवत आहेे. आम्ही अतिधार्मिक राष्ट्रवादामागे याच्या सौम्य स्वरुपासह पळता कामा नये, आम्हाला तत्काळ पर्याय स्वीकारायला हवा, टी. एन. प्रतापन यांनी म्हटले आहे.