ना कोणताही अर्ज, तरीही अदर पूनावाला यांना सुरक्षा का?; नाना पटोलेंचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : कोव्हिशिल्ड लसींच्या मागणीवरून भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी काहींनी मला फोन करून धमक्या देण्याचे काम केले, असे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले. ‘अदर पूनावाला यांना सुरक्षा कशासाठी?, असा सवाल मोदी सरकारला केला.

भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी काहींनी कोव्हिशिल्ड लसींची मागणीवरून मला फोन करून अर्वाच्च भाषेत बोलणे केले. त्यामुळेच मी भारतातून पत्नी आणि मुलांसह लंडनमध्ये आलो आहे, असे अदर पुनावाला यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर नाना पटोले यांनी यावर सवाल उपस्थित केला आहे. नाना पटोले म्हणाले, ‘अदर पूनावाला यांनी आपल्याला देशातील मोठ्या नेत्यांनी धमकावल्याचे म्हटले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नेते असूच शकत नाहीत. तसेच अदर पूनावाला भारतात नसताना आणि त्यांनी राज्य किंवा केंद्र सरकारकडे तसा कोणता अर्ज केलेला नसतानाही केंद्र सरकार वाय दर्जाची सुरक्षा कसं काय देऊ शकतं? असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने अदर पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. अजून सुरक्षा हवी असेल तर दिली जाईल. पण यामागे काय लपलं आहे हे वास्तव समोर आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. शिवाय राज्याच्या जनतेसोबत देशातील जनतेचे लसीकरण होणे ही राज्य सरकारची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.