ही धनगर समाजाची घोर फसवणूक ‘आरक्षण संपवण्याचा भाजप-RSS चा डाव : नाना पटोले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  धनगर आरक्षणावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि आरएसएसवर घणाघाती आरोप केला आहे. धनगर समाज हा समाजातील दुर्लक्षित घटक असून काही लोकांनी प्रलोभने दाखवून समाजाची फसवणूक केली. यातून मुठभर लोकांचा फायदा झाला. मात्र समाज वंचित राहिला. आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भाजपने पाच वर्षे सत्ता भोगली परंतु आरक्षण दिले नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

आदिवासींचे आरक्षण काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे ही धनगर समाजाची मागणी नाही. मात्र, भाजपने आरक्षणाचे आश्वासन देऊन धनगर व आदिवासी समाजामध्ये वाद लावून दिला. पाच वर्षे राज्यात फडणवीसांचे सरकार होते आणि दिल्ली भाजपचे सरकार असताना धनगर समाजाला दिलेले आश्वासन भाजपने पूर्ण केले नाही. सत्ता येताच कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असा शब्द दिला होता. मात्र भाजपने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

पंतप्रधानांवर निशाणा साधताना नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मन की बात करतात ऐकत कोणाचेच नाही. ते ऐकतात फक्त नागपूरचे असा टोला त्यांनी लगावला. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा मोदींना लावला आहे. सर्वाधिक नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्यानंतर आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्याच संपणार आहेत. भाजप-आरएसएसचा आरक्षण संपवण्याच डाव असल्याचा आरोप पटोले यांनी केला.