नाना पटोले म्हणाले, ‘केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले; राज्याने सोडू नये, वेळप्रसंगी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरून वैद्यकीय सुविधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारला टोला लगावला. ‘केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी आता आपली जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे’, असे नाना पटोले म्हणाले.

राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन परिणामकारक ठरत आहे. मात्र, याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. या सर्व परिस्थितीवर बोलताना नाना पटोले म्हणाले, सध्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत आहे. पण केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणे अपेक्षित आहे. मात्र, रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने रेमडेसिव्हिरच्या खरेदीसाठी निविदा काढली असता दोन कंपन्या ज्या आतापर्यंत राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन देत होत्या. त्यांनी आश्चर्यकारकरित्या आपली भूमिका बदलून 31 मे पर्यंत आम्ही महाराष्ट्राला दररोज फक्त 500 इंजेक्शनचा पुरवठा करू असे सांगितले’.

दरम्यान, केंद्र सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यांनी आता आपली जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. पण राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडू नये, वेळप्रसंगी कर्ज काढावे आणि सर्वांचे लसीकरण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

डॉ. मनमोहनसिंग यांनाच उर्मट उत्तर

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोनाविरोधातील लढ्यासंदर्भात काही सकारात्मक सूचना केल्या होत्या. माजी पंतप्रधानांनी केलेल्या सुचनांचा आदर करणे अपेक्षित होते. मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काँग्रेसशासित राज्यातच कोरोनाची वाईट परिस्थिती आहे, त्यांना सल्ला द्या, असे उर्मट उत्तर दिले.