नाना पटोलेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला कठोर शब्दात इशारा, म्हणाले – ‘काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आमदारांना निधी कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. एखादी गोष्ट कमी मिळत असेल तर ती बोलल्यास चूक म्हणता येणार नाही, महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आहे, समान वाटप व्हावे इतकीच आमची अपेक्षा आहे, काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या, अशा कठोर शब्दात पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

निधी कमी मिळत असल्याच्या मुद्द्यावरून काही महिन्यांपूर्वी मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर या समस्येवर तोडगा निघेल अशी शक्यता होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेस आमदारांना निधी कमी देत असल्याची खंत पक्षातून व्यक्त होत आहे. यातच काँग्रेसला बेदखल करू नका असा इशाराच पटोलेंनी ठाकरे सरकारला दिला आहे. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघांनीही दावा केला आहे. परंतु विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील असे वारंवार सांगितले जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध नेमण्याची परंपरा आहे, ती सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून कायम ठेवावी, या संविधानिक पदाची निवड करताना कोणताही वाद होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे पटोले म्हणाले.