थकलेल्या घोडयांवर ‘जॅकपॉट’ लागत नाही, शिवसेनेचा आघाडीवर ‘नेम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते. या विधानावरून शिवसेनेनं सामनाच्या ‘थकलेल्या पक्षाची कहाणी!’ या अग्रलेखातून भाष्य केलं आहे.

लेखातील ठळक मुद्दे –

थकलेल्या घोड्यांवर ‘जॅकपॉट’ लागत नाही –

काँग्रेस पक्ष काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय, सध्याच्या राजकारणातील ‘थकलेले घोडे’च आहेत. त्यांच्या घोडेस्वारांची मांड घट्ट राहिलेली नाही. निवडणुकीच्या शर्यतीत या दोन्ही घोड्यांवर ‘जॅकपॉट’ लागत नाही हे 2014 पासून वारंवार सिद्ध झाले आहे. काँगेस पक्ष तर एवढा थकला आहे की, राहुल यांनी ‘जॉकी’ म्हणून राहण्याचेही नाकारले आणि पुन्हा एकदा सोनिया गांधींना या ‘थकल्या-भागल्या’ पक्षाचा लगाम हाती घेण्याची वेळ आली. पुन्हा त्यादेखील वयोपरत्वे थकलेल्याच आहेत. तरीही पक्षाची धुरा त्यांनी स्वीकारली आहे.

दीडशे वर्षांचा पक्ष थकणार नाही तर काय होणार ? –

लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल यांच्या नेतृत्वाने थोडी उभारी दाखवली होती. त्यांच्या जोडीला प्रियंका गांधी नावाचे ‘टॉनिक’ही पक्षाला देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा ‘शरपंजरी’ पडला. बरं, ज्या तीन-चार राज्यांत त्या पक्षाची सत्ता आहे तेथेही सगळा कारभार म्हाताऱ्या अर्कांच्याच हाती आहे. मग काँग्रेस नावाचा दीडशे वर्षांचा पक्ष थकणार नाही तर काय होणार?

शरद पवारांनी सवयीप्रमाणे नाकारले –

काँगेस पक्ष हा थकलेलाच पक्ष आहे. फरक इतकाच की, ‘सगळं करून भागला आणि नंतर थकला’ अशी त्याची अवस्था आहे. म्हणूनच जनताही त्याला मतांचे टॉनिक द्यायला तयार नाही आणि नेते – कार्यकर्ते या थकल्या पक्षात राहायला तयार नाहीत. काँग्रेस काय किंवा नावात काँगेस असलेला राष्ट्रवादी काय, दोन्ही ‘थकलेल्या पक्षांची कहाणी’ ही अशी आहे. सुशीलकुमार बोलले, शरद पवारांनी सवयीप्रमाणे ते नाकारले, इतकेच.

पवार म्हणतात, मी थकलेलो नाही. ते ज्या पद्धतीने या वयातही निवडणूक प्रचार करीत आहेत, फिरत आहेत ते पाहता त्यांच्यापुरता हा दावा खरा मानला तरी त्यांचा पक्ष काँग्रेसप्रमाणे थकला-भागलाच आहे. त्यांचे नेते-कार्यकर्ते तेथे राहायला तयार नाहीत आणि त्यांना थोपविण्याची ताकद त्या पक्षात राहिलेली नाही.

विलीनीकरणाचा बार फुसकाच –

काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीतरी एकाच झाडाखाली वाढले. ते एकाच आईची लेकरे आहेत. एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढले,’ असेही सुशीलकुमार म्हणाले. त्यांचे म्हणणे खोटे नाही. तथापि, काँग्रेसमध्ये ‘माय’ म्हणेल ती पूर्व दिशा तर राष्ट्रवादीमध्ये ‘बाप’ म्हणेल ती पूर्व दिशा अशी स्थिती आहे. अशावेळी दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा बार तूर्त तरी फुसकाच निघणार होता.

Visit : Policenama.com